मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात आज जिल्हा आणि सत्र न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. 11 मार्च 2011 रोजी नागपूरच्या नंदनवन परिसरात 21 वर्षांची मोनिका किरणापुरेची हत्या झाली होती.
कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे, रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे, अशी या खटल्यातील आरोपींची नावे आहेत.
मोनिका मुळची रामटेकची आणि नागपुरात नंदनवन परिसरातील प्रतिभा पवार महिला वसतिगृहात राहत होती. राजश्रीताई मुळक अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारी मोनिका वसतिगृहातून महाविद्यालयाकडे जात असताना चार हल्लेखोरांनी पाठीवर वार करुन तिची हत्या केली होती. पोलिसांनी अनेक महिने तपास करुन याप्रकरणातील पाच आरोपींना अटक केली होती. भाड्याच्या गुंडांच्या मदतीने मोनिकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.
गुंडांना सुपारी देणाऱ्या कुणाल जयस्वालचे मोनिकाच्या वसतिगृहात राहणाऱ्या ऋषाली नावाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, ऋषालीने कुणालचं प्रेम नाकारल्याने रागावलेल्या कुणालने भाड्याच्या चार गुंडांना ऋषालीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. मात्र, या गुंडांनी ऋषालीवर हल्ला करण्याऐवजी चुकून निष्पाप मोनिकाला ठार मारलं.
या प्रकरणात एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले असून न्यायालय आता या प्रकरणात काय निर्णय देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.