गेल्या अडिच वर्षापासून घराघरामध्ये प्रसिद्ध झालेली ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आता लवकरच संपणार आहे. या मालिकेतील श्री आणि जान्हवी यांना कन्यारत्न झाल्याचे दाखविल्यानंतर या मालिकेचा शेवट होणार आहे. २३ जानेवारीला या शेवटचा एपिसोड दाखविण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा होती. तसेच जान्हवीला बाळ कधी होणार असा गहन प्रश्नही चाहत्यांना पडला होता. तिच्या बाळंतपणाच्याही चर्चा रंगत होत्या. अखेर या प्रश्नाची उत्तर चाहत्यांना मिळाली आहे. मालिकेच्या शेवटी जान्हवीला मुलगी होणार आहे. या मुलीच्या बारशाचा समारंभ करून या मालिकेचा शेवट होणार आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. श्री आणि जान्हवी ही जोडीने कमी वेळात चाहत्यांना आपलेसे केले. ही जोडी छोट्या पडद्यावर हीट जोडी ठरली. ही मालिका आता संपत असली तरी भविष्यात या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांना पहायला मिळण्याची शक्यता आहे.