पहिल्या दिवशी दोन पैलवानांना बंदी घातलेली शक्तिवर्धक इंजेक्शन्स घेताना रंगेहाथ पकडले गेल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्घाटनापूर्वीच ‘डोपिंग’चे गालबोट लागले. पालकमंत्री कार्यालयाच्या आयोजन समितीचे सदस्य दीपक खिवरकर यांनी पैलवानांकडील शक्तिवर्धक इंजेक्शन्स ताब्यात घेऊन ही बाब पंच समितीच्या निदर्शनास आणली.
‘डोपिंग’चा प्रकार स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच उघडकीस आला. स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यासाठी पैलवान बंदी घातलेली औषधे सेवन करतात. उत्तेजक द्रव्य सेवनामुळे पैलवानांच्या प्रकृतीवर परिणाम होतोच. मात्र अन्य गुणवान आणि प्रतिभावंत पैलवानांची मेहनत वाया जाते. महाराष्ट्रासह देशातील एक मानाची कुस्ती स्पर्धा ओळखल्या जाणा-या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गुरुवारपासून चिटणीस पार्कवर सुरुवात झाली.
१० जानेवारीपर्यंत चालणा-या या स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले. यंदाच्या कुस्तीतील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुरस्कार पटकावण्यासाठी महाराष्ट्रातील अव्वल कुस्तीपटूंमध्ये चुरस आहे. यंदा जळगावचा विजय चौधरी, मुंबईचा विक्रांत जाधव व सोलापूरचा नीलेश लोखंडे हे तिघे किताबासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सलामीच्या कुस्तीनंतर ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ आणि ९७ किलो गटातील माती आणि गादी (मॅट) प्रकारातील कुस्त्या रंगल्या.