बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला काल रात्री मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ऋतू खन्नासोबत आक्षेपार्ह वर्णन आणि धमकी दिल्याच्या आरोपावरुन राकेश सावंतला अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री ऋतू ही ‘झाँसी की रानी’, लक्ष्मी तेरे आँगन की, शकुन्तला यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकेत काम केलं आहे.
काल रात्री ओशिवरा येथील लोखंडवाला परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये अभिनेत्री ऋतू तिचा बॉयफ्रेंड रोहित कपूरसोबत गेली होती. तिथे तिने कॉफीची ऑर्डर दिली. त्याचवेळी त्या कॉफी शॉपमध्ये अभिनेत्री राखी सावंत आणि राकेश सावंत हे देखील तिथेच होते. ऋतूच्या म्हणण्यानुसार, तिथे असलेल्या राकेश आणि त्याच्या काही मित्रांनी माझ्यावर अश्लील टिप्पणी मारणं सुरु केलं. तसंच त्यांच्या मोबाइलमधून फोटो देखील काढण्याचा प्रयत्न केला.
तर ऋतूचा बॉयफ्रेंडच्या मते, त्यांच्या आधी तिथं बसलेल्या एका जोडप्याला देखील हे लोक अशाचप्रकारे त्रास देत होते. त्यावेळेस राकेश सावंत हा दारुच्या नशेत होता. असाही दावा त्याने केला. जेव्हा ऋतू आणि रोहित कॉफी शॉपमध्ये पोहचले तेव्हा त्यांना पाहून राकेशने अश्लील टिप्पणी सुरु केली. त्यानंतर रोहितने तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावलं. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत राकेशला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या मते, राकेस दारुच्या नशेत होता. ऋतूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी असभ्य वर्तन आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली राकेश सावंत विरोधात एफआयआर नोदंवली आहे.
अभिनेत्री ऋतूच्या तक्रारीनंतर त्याला पोलिसांनी अटकही केली. मात्र, काही वेळातच त्याची जामीनावर सुटकाही करण्यात आली. आपण निर्दोष असून पुढील चौकशीत ते स्पष्ट होईल असं राकेशचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पोलीस कॉफी शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणी पुढची कारवाई करणार आहेत.