शालेय स्पर्धेत १००९ धावांची विश्वविक्रमी खेळी करणा-या कल्याणच्या प्रणव धनावडेला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) स्कॉलरशिप जाहीर केली आहे.
या स्कॉलरशिपअंतर्गत प्रणवला पुढील पाच वर्षे दरमहा १० हजार रुपये दिले जाणार आहेत. एमसीएने बुधवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
ही स्कॉलरशिप जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीकरिता असेल. या कालावधीत प्रणवचे क्रिकेट प्रशिक्षण आणि शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेण्यात येईल, असेही असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.
कल्याणमधील के. सी. गांधी हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या १५ वर्षीय प्रणवने एमसीए आयोजित भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी १००९ धावा फटकावण्याचा विक्रम केला.