सौदी अरब आणि इराणदरम्यान तणाव वाढल्यामुळे सराफा बाजार सोने आणि चांदीच्या चमकीने उजळला. जागतिक बाजारासह भारतीय सराफा बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने सोने आणि चांदीचे भाव झळाळले. राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १९५ रुपयांनी चकाकत २५,६१५ रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) पोहोचला.
जानेवारीच्या मध्यात लग्नसराई सुरू होणार असल्याने सराफा व्यावसायिक खरेदी करीत असल्याने सराफा बाजाराला बळ मिळाले. राजकीय अस्थैर्य आणि सराफा व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने भाव वधारले, असे जाणकारांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करणाऱ्या कंपन्यांच्या खरेदीमुळे चांदीचा भाव ३२५ रुपयांनी झळाळत ३३,६२५ रुपयांवर (प्रति किलो)
गेला.
सौदी अरब आणि इराणदरम्यान तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर दिल्याने जागतिक बाजारात सोने तेजीत आले. जागतिक बाजारातील या सकारात्मक प्रभावाने भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचा भाव वधारला.