राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये सध्या साडेचार हजार निवासी डॉक्टर असून त्यांना महिन्याला ४२ हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र हे वेतन कमी असून सध्याच्या ६५०० या मूळ वेतनात (बेसिक) वाढ करण्याची मागणी या डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ या संघटनेने (मार्ड) केली होती. आपल्या या मागणीसाठी या डॉक्टरांनी राज्यव्यापी आंदोलनही केले होते. त्या वेळी विद्यावेतनात वाढ करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. त्यानुसार या डॉक्टरांच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून त्यामुळे सरकारवर वार्षिक २३ कोटींचा बोजा पडणार आहे.