महात्मा गांधी रुग्णालयात आग

महात्मा गांधी रुग्णालयात आग

परळ येथील महात्मा गांधी मेमोरिअल रुग्णालयाच्या तळमजल्यावर सोमवारी सायंकाळी लागलेल्या आगीत भंगार खोलीतील सामान खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

गांधी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज २०० हून अधिक लोक उपचारासाठी येतात. सोमवारी अचानक दुपारी ३.४० वाजता रुग्णालयातील तळमजल्यावरील गोदामाला अचानक आग लागली. या आगीत परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

मात्र, डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचा-यांच्या प्रसंगावधानामुळे रुग्णालयातील रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. आग पसरत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे पाच बंब व एक रुग्णवाहिका लगेच घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. या आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत रुग्णांच्या उपचारांची कागदपत्रे, फाईल्स व महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, कोणाला दुखापत झाली नसल्याची माहिती गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन भगत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *