पेंच प्रकल्पालगत दोन वाघांचा मृत्यू

नववर्षांच्या प्रारंभीच महाराष्ट्र व मध्यप्रदेशने दोन वाघ गमावले आहेत. महाराष्ट्रातील वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची शक्यता आहे, तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत एका वाघाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील रामटेक तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील देवलापार वनपरिक्षेत्रापासून अवघ्या ६ किलोमीटरवर वाघाच्या मृत्यूची घटना शनिवारी उघडकीस आली. सुमारे चार ते पाच वर्षांंचा पूर्ण वाढ झालेला वाघ उमरी गावातील तलावाजवळ आढळल्याने विषबाधेने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता आहे. वाघाच्या मृतदेहाशेजारी हरणाचा मृतदेह, तसेच अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील रानडुकराचा मृतदेह आढळून आला. शनिवारी गस्तीवर असलेल्या वनरक्षकाच्या लक्षात ही बाब आली. येथील नियमित वनरक्षक सुटीवर असल्याने त्याच्याऐवजी नवीन वनरक्षक वनमजुरासह गस्त घालत असताना वाघ, हरीण आणि रानडुकरांचे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. नागपूरहून रात्रीच वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. रविवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *