मोबाईल अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सुविधा उपलब्ध करुन देणा-या उबेर टॅक्सीमध्ये पुन्हा एकदा महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
पिडीत महिलेच्या भावाने फेसबुकवर अमेरिकास्थित उबेर टॅक्सीच्या निष्काळजी सेवेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पिडीत महिलेने घडलेल्या प्रकाराची उबेर इंडियाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. पिडीत महिला शनिवारी संध्याकाळी उबेर टॅक्सीने दिल्लीहून गुरगाव येथे चालली असताना, चालकाने या महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. विनोद असे आरोपी चालकाचे नाव आहे.
उबेरने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर काही मिनिटातच आमच्या टीमने संबंधित चालकाशी संर्पक साधला. उबेरमधील अनेकांनी चालकाशी बोलून घटनाक्रम समजून घेतला. प्रवाशांशी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक सहन न करण्याचे आमचे धोरणे आहे. आम्ही तात्काळ कारवाई केली आहे.
आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करु तसेच तक्रारदाराला आवश्यक सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत असे उबेरकडून सांगण्यात आले. उबेरच्या टॅक्सी चालकाने मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात टॅक्सीमध्येच महिला प्रवाशावर बलात्कार केला होता. तेव्हापासून उबेरची टॅक्सीसेवा वादाच्या भोव-यात सापडली आहे.