रायगड पोलीस आता ऑनलाइन

रायगड पोलीस आता ऑनलाइन

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन्स आणि उपविभागीय कार्यालये आजपासून ऑनलाइन होणार आहेत. सीसीटीएनएस अर्थात क्राईम, क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्सला संगणकीय प्रणालीने जोडण्याचे काम पूर्ण झाले असून नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीमुळे पोलीस दलातील कामकाजात क्रांतिकारी बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील गुन्हे आणि गुन्हेगार यांचा एकत्रित टेटा संकलित व्हावा, तपासकार्यात गतिमानता यावी, माहितीची देवाणघेवाण जलद पद्धतीने व्हावी, साचेबद्ध कामाला फाटा देऊन सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभरात राबविला जाणार आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीतील २६ पोलीस स्टेशन्स आणि ८ उपविभागीय कार्यालये आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांमध्ये ही यंत्रणा १ जानेवारी २०१६ पासून कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे तंत्रज्ञान विप्रो कंपनी पुरवणार आहे. प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला चार संगणक, दोन पिंट्रर, एक मोडेम, यूपीएस, डिझेल जनरेटर विशेष प्रशिक्षित पोलीस कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा कारभार उद्यापासून कागदपत्रविरहित होणार आहे. त्यामुळे एफआयआर रजिस्टर, स्टेशन डायरी, दैनंदिनी रजिस्टर आता इतिहासजमा होणार आहे. गुन्हे आणि तक्रारीविषयक सर्व माहिती यापुढे संगणकात थेट नोंदवली जाणार आहे. एफआयआरसह १ ते ७ अन्वेषण फॉर्म, अकस्मात मृत्यू, अपघात, दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे यांची नोंद थेट संगणकातच घेतली जाणार आहे. पोलीस दलाच्या या कार्यप्रणालीमुळे क्रांतिकारक बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पोलीस दलाच्या कारभारात गतिमानता, सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यास हा प्रकल्प निश्चितच साहाय्यभूत ठरेल असे मत पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *