श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे
गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मात्र, उत्तरार्धातील बदललेला आणि दहशतवाद नष्ट करण्यासाठी सगळीकडे बोंबलत फिरणाऱ्या मोदींचे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. कोणाचीही गोळी लागू शकत होती, बॉम्बगोळा पडू शकत होता. तसे झाले असते तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपला असता आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती.. हे विधान आहे, पिंपरीतील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डीतील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष मोहन देशमुख, पिंपरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, प्राचार्य नितीन घोरपडे, अमृता गुलाटी आदी या वेळी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, संघर्षांच्या जागा आहेत, त्या असू द्या. आपण आता संवादाकडे वळले पाहिजे. पाकिस्तानच्या गुलाम अलीला भारतात येऊ द्या, त्याला येथे गाऊ द्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पंतप्रधान काबूलवरून अचानक पाकिस्तानात जातो. त्यांना नवाज शरीफचा पुळका आला नव्हता, तर राष्ट्राचा पुळका आला होता. गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी आहे. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मात्र, उत्तरार्धातील म्हणजे आजचा मोदी गांधींचे, बुद्धाचे नाव घेतो. जगातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी तो पुढाकार घेतो आणि ३० मुस्लीम राष्ट्रांची मोट बांधतो, अमेरिका, चीनशी मैत्री करतो, सगळीकडे बोंबलत फिरतो. पण गांधी आणि बुद्धाचे नाव घेतो.
असा पंतप्रधान राष्ट्रवादी आहे की नाही, असा सवाल करून ते म्हणाले की, हा पंतप्रधान नवाज शरीफच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेला, तो हातावर शीर घेऊन गेला. कारण, ही मरायची लक्षणे होती. दाऊद पाकिस्तानात आहे, दहशतवाद्यांचे अनेक अड्डे तिथे आहेत. कोणाचीही गोळी लागू शकत होती, बॉम्बगोळा येऊन पडला असता आणि नरेंद्र मोदी एका दिवसात संपला असता आणि आपल्याला पाडगावकरांच्या आधीच मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती. एवढे समर्पण करणारा हा माणूस आहे. त्याचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद केला पाहिजे.
इंग्रजीला विरोध करणारे लबाड
जी माणसे इंग्रजीला विरोध करतात आणि मराठीसाठी ज्यांचा कंठ दाटून येतो, ती माणसे लबाड असतात. कारण यांचीच मुले इंग्रजी शाळेत शिकत असतात, ही विसंगती लक्षात घेतली पाहिजे. इंग्रजी ज्ञानभाषा आहे, तिला विरोध करण्याचे कारण नाही. पाय मराठीचा असू द्या, मेंदू इंग्रजीचा असला तरी चालेल, अशी टिप्पणी श्रीपाल सबनीस यांनी यावेळी केली. संगणकाच्या माऊसला उंदीर म्हणणार का, मराठीतील ‘इश्श’ या शब्दाला इंग्रजीत काय शब्द आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.