भाजपच्या अध्यक्षपदावर अमित शाह यांची दुसऱ्यांदा वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष पदासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवड करण्यात येणार आहे. 4 जानेवारीनंतर भाजपची संसदीय समिती निवडणुकीची तारीख निश्चित करणार आहे.
अमित शाह यांची जवळपास दुसऱ्यांदा निवड निश्चित मानली जाते आहे. उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीत भरघोस जागा निवडून आणण्यात अमित शाह यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्याची अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती.
मात्र, नुकत्याच झालेल्या बिहार, दिल्ली या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर अमित शाह यांची खुर्ची धोक्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र दिल्लीतल्या नेत्यांकडून अमित शाह यांना पुन्हा पसंती मिळल्याचं समजतं आहे.