खाजगी क्षेत्रातील महिला नोकरदारांना मिळणाऱ्या प्रसुती रजेत वाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे.
नोकरदार महिलांना प्रसुती काळात मिळणारी रजा 12 आठवड्यांवरुन 26 वर नेण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही निर्णयाला दुजोरा दिला आहे. प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात
बाळाच्या पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करुन ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबत लेखी पत्र कामगार
मंत्रालयाला पाठवण्यात आलं होतं. त्याला कामगार मंत्रालयाने सहमती दर्शवली आहे.
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. त्यात वाढ करुन रजा साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र ही रजा आठ महिन्यांची व्हावी, अशी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची अपेक्षा होती. मात्र कामगार मंत्रालयाने प्रसुती रजा साडेसहा महिने करण्यास सहमती दर्शवली आहे.
प्रसुती रजा साडेसहा महिने, खाजगी क्षेत्रातील महिलांना लाभ
