अंबरनाथमध्ये शिवसेनेचे नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष रमेश साहेबराव गुंजाळ यांची शुक्रवारी भरदिवसा हत्या झाली. उल्हानगरमध्ये चो-या आणि घरफोडीच्या घटना रोज वाढत असून, भरवस्तीच्या शिवाजी चौक परिसरात एकाच रांगेतील पाच दुकाने चोरटय़ांनी फोडल्याची घटना रात्री घडली. वडाळा येथे ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. तर मालाड येथे पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे.
मुंबई आणि उपनगरांत घरफोड्या, चो-या, दरोडे, बलात्कार यांनी नववर्षाचा अखेरचा सप्ताह कलंकित झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहराप्रमाणेच आता मुंबई आणि उपनगरेसुद्धा दरोडेखोरांची शहरे झालेली आहेत.
ठाण्यामध्ये दोन आठवडय़ांपूर्वी एकाच आठवड्यात सहा दुकानांवर दरोडे पडले असून, लाखो रुपयांचा माल लुटला गेला. यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास अद्याप लागला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र? असे आता राजरोसपणे विचारले जात आहे.
अंबरनाथ शहरातील शिवसेना नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष रमेश (पप्पू) साहेबराव गुंजाळ यांची शुक्रवारी अज्ञात मारेक-यांनी निर्घृण हत्या केली. यामुळे अंबरनाथमधील नगरसेवकांच्या हत्यांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागातील रॉयल पार्क प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवकपप्पू गुंजाळ हे पश्चिम भागातील मोरिवली गावात राहत होते. नेहमी अंगरक्षकांच्या गराडय़ात असणारे गुंजाळ शुक्रवारी सकाळी एकटेच दुचाकीवरून मोरिवली नाका येथे दाढी करण्यासाठी गेले होते. मात्र १० वाजताच्या सुमारास ते दाढी करून परत येताना त्यांना अडवत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर, मानेवर, हातावर व पोटावर वार केले आणि तिथून पसार झाले. गुंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गुंजाळ यांना उचलून अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तेथून कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र अखेर दुपारी २.४५च्या सुमारास त्यांचे निधन झाले. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुंजाळ यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गुंजाळ हे कामगार कंत्राटदार असल्याने त्यांची हत्या व्यावसायिक वादातून झाली की राजकीय वादातून? याचाही शोध पोलीस घेत आहेत.
उल्हासनगरात ५ दुकाने फोडली
उल्हासनगरातील शिवाजी चौक परिसरात एकाच ठिकाणी चोरटय़ाने पाच दुकाने फोडल्याची घटना घडली. शहरातील कॅम्प ३ येथील महावीर इंटरप्रायझेस, श्रीराम सिरॅमिक, हरिओम ट्रेडर, एल.बी. गादी, श्रुर्ती कार्ड, वेरिता मल्टिफिल्म ही पाच दुकाने फोडली. रोख व वस्तू त्यांनी चोरून नेल्या. पाच दुकाने फोडल्याने व्यापारी संतापले आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळा : सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या
मुंबईत वडाळा येथे एका सहा वर्षाच्या मुलाची काही अज्ञात मारेक-यांनी निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.या मुलाचे नाव खुशबन रहिम खान असून त्याचे दोन महिन्यांपूर्वीच अपहरण झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी अज्ञात मारेक-याविरोधात अपहरण, हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरूकेली आहे. रहिम खान हे टॅक्सीचालक असून ते ते पत्नी, दोन मुलांसोबत वडाळ्याच्या दीनबंधू नगरात राहतात. त्यांना खुशबन हा सहा वर्षाचा मुलगा आहे. १३ ऑक्टोबरला तो घरासमोरच खेळत असताना काही अज्ञात व्यक्तीनी त्यांचे अपहरण केले होते. तो उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात खुशबन बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. त्याचा शोध सुरूअसतानाच शुक्रवारी रात्री नऊ वाजता त्याचा मृतदेह वडाळ्यातील पूर्व मुक्त मार्गावर भक्ती पार्क ब्रीजखाली बॉक्सच्या गटारात सापडला. ही माहिती मिळताच वडाळा टी. टी. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचा मृतदेह नंतर शीव रुग्णालयात पाठवला होता. हा मृतदेह पाहिल्यानंतर रहिम खान याने तो त्यांचाच मुलगा असल्याचे ओळखले.
या सहा वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या घटनेची वरिष्ठ पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून मारेक-यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरूकरण्याचे आदेश दिले. वडाळा टी. टी. पोलिसांसह स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.
मालाड : पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार
मालाड येथे एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एका सोळा वर्षाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात तो सध्या डोंगरीतील बालसुधारगृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच वर्षाची पीडित मुलगी मालाड येथील लिंक रोडवर तिच्या पालकांसोबत राहते. तिच्याच शेजारी सोळा वर्षाचा आरोपी मुलगा असून तो सध्या अकरावीत आहे. एप्रिल महिन्यात त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तिला घरी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार तिच्या पालकांना समजताच त्यांनी या मुलाला बेदम मारहाण केली. मात्र या मुलाच्या पालकांनी त्यांची माफी मागून यापुढे त्याच्याकडून असा प्रकार होणार नाही याची हमी दिली होती. त्यामुळे पीडितेच्या मुलीच्या पालकांनी तक्रार केली नव्हती. मात्र त्यानंतरही या मुलाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वी त्याने हा प्रकार केल्याने पीडितेने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. अखेर या मुलीच्या पालकांनी मालाड पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्याअंतर्गत त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा सोळा वर्षाचा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधार न्यायालयात पाठविण्यात आले होते. तेथून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
चर्चगेट : चोरी प्रकरणी आरोपीस अटक
चर्चगेट परिसरातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये घुसून सात लाख रुपयांचा ऐवज पळून गेलेल्या आरोपीस मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. मोहन रमेश कांबळे असे या आरोपीचे नाव असून त्याला याच गुन्ह्यात येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सीसीटिव्ही फुटेजवरुन मिळालेल्या फोटोवरून नाकाबंदी करणा-या पोलिसांनी आरोपीस शिताफीने अटक केल्याचे सांगण्यात आले. यातील तक्रारदार चर्चगेटच्या एका निवासी इमारतीत कुटुंबासोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा ते संगणकावर काम करीत होते. त्यावेळी त्यांच्या घरी चोरटय़ाने प्रवेश केला होता. कपाटातील सोन्याचे हिरेजडीत दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख रुपयांचा ऐवज घेऊन तो पळून गेला होता. या चोरीची तक्रार घरमालकाने मरिन ड्राईव्ह पोलिसांना दिली. सीसीटिव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक तरुण संशयास्पदरीत्या इमारतीत घुसत असल्याचे दिसले होते. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरूकेली होती.
नाकाबंदीदरम्यान मोहन कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. मोहन हा एमआरए मार्गावरील बी ब्लॉक, मनपा चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यात त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.