अकोल्यात दत्तजयंती निमित्त एक आगळेवेगळी महापंगत झाली आणि यात स्पेशल पाहुणे होते गाई आणि कुत्री. अकोल्यातील अमृत ग्यारल हे मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमात दत्त जयंतीला अकोल्यातील तब्बल 50 गायी आणि 100 कुत्री जेवली.
गाय आणि कुत्रा हे दोघेही दत्ताचे वाहन. त्यामुळेच दत्त जयंतीला यावेळी पंचपक्वानांचं जेवण देण्यात आलं. जिलेबी, बालूशाही, बुंदीचे लाडू, ब्रेड, दूध, बिस्कीट, डबलरोटी आणि गाईंसाठी कोवळा चारा, अगदी सगळं होतं इथे.
दत्त जयंतीची पूर्वसंध्या आणि दत्त जयंतीला या महाभोजनचं आयोजन केलं जातं. मागील दहा वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरु आहे. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे अन्नछत्र सुरु होतं, ज्यात 50 गाई आणि 100 कुत्र्यांनी चमचमीत भोजनाचा आस्वाद घेतला.
अमृत ग्यारल हे गवंडी काम करतात आणि सध्या अकोल्यात गवंडी कामावर संक्रांत आली आहे. विशेष म्हणजे गवंडी काम करणाऱ्या अमृत ग्यारल यांच्याकडे या वर्षी पैसे नसताना दहा हजार रुपये उसणे आणून त्यांनी या महाप्रसादाचं आयोजन केलं होतं.