मुंबई गारठली, पण महाबेश्वरमध्ये कडक ऊन

मुंबई गारठली, पण महाबेश्वरमध्ये कडक ऊन

एरव्ही घामाने ओथंबणारे मुंबईकर सध्या तापमान घसरल्याने चांगलेच गारठले आहे. मुंबईत काल रात्रीचं तापमान 13 अंश सेल्सिअस होतं. त्यामुळे स्वेटर आणि मफलरने मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात झाली. वातावरणात गारवा वाढल्याने मुंबईकरही या थंडीची मजा लुटताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट असल्याने मुंबईसह राज्याच्या काही भागात थंडीचा जोर वाढल्याचं म्हटलं जात आहे..

दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये मात्र कडक ऊन आहे. थंडीची मजा लुटण्यासाठी महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा असतो, मात्र राज्यात सगळीकडे थंडी असताना महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची मात्र निराशा होत आहे. अद्याप महाबळेश्वरचा पारा खाली गेलेला नाही. त्यामुळे आता पर्यटकांची गर्दीही ओसरली असून त्याचा परिणाम इथल्या व्यवसायांवर झाला आहे.

माऊंट अबूचा पारा उणे 1 अंश

राजस्थानमधील माऊंट अबूमध्ये पारा उणे एक अंशावर पोहोचला आहे. माऊंट अबूमध्ये वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. गुरुशिखर आणि कुम्हारवाडा या शिखरांवर उणे 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पण कडाकाच्या थंडीची मजा लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक माऊंट अबूमध्ये येत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसाठीही यंदाचा थंडीचा मोसम भरभराटीचे दिवस घेऊन आला आहे.

पृथ्वीवरील स्वर्गात बर्फाची चादर

उत्तर भारतात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे देशभरात थंडीची लाट पसरली आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. पण बर्फाचे मोठे थर घर आणि रस्त्यांवर जमा झाल्याने त्याचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *