मुंबईच्या महाविद्यालयामध्ये चर्चेचा विषय असलेल्या साठ्ये महाविद्यालयाच्या माध्यम महोत्सवाचे काल थाटात उद्घाटन झाले. प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले आणि कामगार नेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
माध्यम महोत्सव हा साठये महाविद्यालयातील मास मीडिया विभागातर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा उत्सव आहे. यात प्रत्येक वर्षी कोणती तरी एक संकल्पना घेतली जाते. या वर्षीची संकल्पना माध्यमगड ही आहे.
या संकल्पनेचे सर्वच मान्यवरांनी व उपस्थितांनी कौतुक केले. वैभव मांगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले कि, सोशल मीडियाचा अतिरिक्त होणारा वापर हा थांबला पाहिजे तसेच त्यामध्ये मेसेज फॉरवर्ड करत असताना स्वतः आपण जागरूकता ठेवणे आवश्यक आहे.
कामगार नेते जितेंद्र जोशी यांनी देखील विद्यार्थ्यांना महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. जोगेश्वरी येथील प्रसिध्द संघर्ष ढोलताशा पथक आण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे मर्दानी खेळाचे पथक हे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
या दरम्यान शिवाजी महाराजांच्या जन्मादरम्यानची परिस्थिती, जन्मानंतरचे जिजाऊचे स्वप्न आणि राज्याभिषेक सोहळा असे शिवरायांच्या आयुष्यातील विविध महत्वपूर्ण टप्पे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी सादर केले.तसेच शिवकालीन किल्ले नाण्यांचे आणि शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
तसेच मोडी लिपीवरील कार्यशाळा कौस्तुभ कस्तुरे यांनी घेतली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे, उपप्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि डॉ. मिलिंद जोशी तसेच मास मीडिया विभागाचे प्रमुख गजेंद्र देवडा आणि प्राध्यापक मंडळी यांचे मार्गदर्शन लाभले.