मार्गशीर्ष व्रतासाठी बाजार फुलला

मार्गशीर्ष व्रतासाठी बाजार फुलला

मार्गशीर्षातील पहिल्या गुरुवाराची चाहूल लागताच बाजारपेठा पूजेच्या साहित्याने फुलून गेल्या आहेत. आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असल्याने बुधवारी बाजारात महिलांची खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत होती. पिशव्या भरभरून फळे, फुले, गजरा, वेणीची खरेदी करताना महिला नजरेस पडत होत्या. महालक्ष्मीच्या व्रतासाठी पूजाविधीचे लागणारे साहित्य, आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी वेणी, नारळ यांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जात होती. सोबत पूजेनिमित्त घरी येणा-या सुवासिनींसाठी वाणाची खरेदी केली जात होती.

परळ, दादर, मालाड, बोरिवली आदी ठिकाणी बाजारपेठेत महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मार्गशीर्षातील गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताला धार्मिक महत्त्वासोबत सामाजिक महत्त्वही तितकेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या वेगवान आयुष्यात शेजारच्या किंवा जवळपास राहणा-यांसोबत संवाद मोजकाच होतो. पण गुरुवारच्या व्रताच्या निमित्ताने प्रत्येकीचे भेटणे होत असल्याचे दादर येथील गृहिणी जयश्री साटम यांनी सांगितले. फळा-फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी प्रत्येक जण आपापल्या परिने खरेदी करत आहेत. महागाईमुळे पाच फळांसाठी डझनवारी एक एक फळ घेणे परवडत नाही. अशी खरेदी केल्यास अडीचशेहून अधिक रुपयांपर्यंत खरेदी जाते. याला काही ठिकाणी फळविक्रेत्यांनी चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

एक एक फळ असलेली पाच फळांची एक पिशवी बाजारात ६०-७० रुपयांपासून सुरू होत आहे. एक एक फळ घेण्यापेक्षा ही पिशवी घेण्याकडे महिलांचा कल असल्याचे मालाड येथील फळ विक्रेत्याने सांगितले. केळी, सफरचंद, मोसंबी, द्राक्ष, बोरं, डाळिंब आदी फळांची खरेदी केली जात आहे. फळांसोबत आंब्याचे डहाळे, पाच फुलझाडांची किंवा फळझाडांची पानेही खरेदी केली जात आहेत. आंब्याच्या डहाळांची टोपली घेऊन महिला विक्रेत्या नजरेस पडत आहेत. १५, २० आणि २५ रुपयांना ही डहाळी विकली जात आहेत. शेवंतीची सुवासिक वेणी, गजरे यांच्या किमतीही महाग आहेत. एक वेणी किमान ३० रुपयांना मिळत असून गज-याची किंमत २० रुपयांपासून सुरू आहे. महालक्ष्मीच्या मुखवटय़ांसह सजावटीसाठी लागणारे दागिने, कपडे, बांगडय़ा, मुकुट आदी साहित्य रेडीमेड पॅकेटमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *