पेट्रोल, डिझेलच्या दरात मंगळवारी रात्रीपासून कपात करण्यात आली असली तरी केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात वाढ केली आहे.
पेट्रोलवरील अवकारी करात प्रति लीटर ३० पैसे तर डिझेलवर १.१७ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता ८.५४ रुपये तर डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवून ५.८३ रूपये करण्यात आले आहे.
आतापर्यंत सरकारने पाचवेळी पेट्रोलवरीलअबकारी करात वाढ केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत २ हजार ५०० कोटी रुपये जमा होणार आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद भरून निघणार आहे.
या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सरकारने पेट्रोलचे दर प्रतिलिटर ५० पैसे; तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४६ पैशांची कपात केली. नवीन दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.