मंत्री असूनही रवींद्र वायकरांचा जीव महापालिकेतच

मंत्री असूनही रवींद्र वायकरांचा जीव महापालिकेतच

मुंबई महापालिकेत सलग चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवल्यानंतर आमदार झालेल्या रवींद्र वायकर यांच्या गळ्यात गृहनिर्माण राज्यमंत्रीची माळ पडली. पण मंत्री झाल्यानंतरही वायकरांचा जीव अजूनही महापालिकेतच घुटमळत आहे. महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरणाला शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त व महापौरांना पाठवून मध्य वैतरणा धरणाचे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे करावे,असे म्हटले आहे. महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी असताना शिवसेनाप्रमुखांनी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्पाबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती घेऊन उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला. या प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून मुंबईकरांना अतिरिक्त ४५५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करणे मुंबई महापालिकेला शक्य झाले होते.

त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचा विचार करणा-या अशा थोर नेत्याचे नाव मध्य वैतरणा पाणी प्रकल्पाला दिल्यास मुंबई आणि महापालिकेकडून आगळीवेगळी श्रद्धांजली ठरेल,असे वायकर यांनी म्हटले आहे.

नगरसेवक राहूनही नामकरणाचे पत्र कुणाला देतात याचा विसर

नामकरण करण्याच्या मागणीचे हे पत्र वायकरांनी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासोबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाठवले आहे. परंतु नामकरणाचे प्रस्ताव मंजूर करणे हे लोकप्रतिनिधींच्या अखत्यारित येत असून अशाप्रकारचे पत्र महापौरांना पाठवणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्तांना पत्र पाठवणे गरजेचे नाही. तरीही नामकरणाचे पत्र आयुक्तांना पाठवून वायकरांनी महापालिकेच्या नियमांचा विसर पडल्याचे दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *