येत्या २६ तारखेपासून मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर ४०जादा लोकल सोडण्यात येणार आहेत. लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या विशेष समितीची आज बैठक पार पडली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारीपासून या जादा लोकल सोडण्यात येणार आहेत.
ठाणे-वाशी आणि पनवेलसाठी २२, हार्बर रेल्वेमार्गावर म्हणजे सीएसटी ते पनवेलसाठी७, तर कुर्ला ते ठाणे, ठाणे ते कल्याण आणि बदलापूर ते टिटवाळासाठी ११ जादा लोकल मिळणार आहेत.
तसंच अपघात रोखण्यासाठी २५ ठिकाणांवर विशेष उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. मुंबईतील लोकल प्रवासी सुरक्षेसाठी नेमलेल्या विशेष समितीची बैठक पार पडली. यात मध्य आणि हार्बर रेल्वेसाठी विशेष सुधारणा केल्या जाणार आहेत.
ठाणे स्टेशन वरचा प्रवासी भार कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान नव्या स्टेशनचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी मुंबई महापालिकेनंही ५०० कोटींची तरतूद केली आहे. या आराखड्याला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
सर्वाधिक अपघात होणाऱ्या २५ ठिकाणांसाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. अपघात रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांसाठी तातडीचे विशेष बजेट असणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचा अहवाल घेउन किरीट सोमय्यांसह मुंबईतील काही खासदार बुधवारी रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित बंद दरवाजाचे विशेष कोच प्रस्तावित आहेत. अशा प्रायोगिक तत्वावरचा एक कोच तयार करुन चालवण्यासाठी किरीट सोमय्यांनी खासदार फंडातून ५० लाख रुपये देण्याचं घोषित केलं आहे.