माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवारी) मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भव-दिव्य “कृतज्ञता‘ सोहळा साजरा होत आहे.
वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला सर्वच पक्षांच्या दिग्गजांसह कला, क्रीडा, साहित्यिक, उद्योजक, चित्रपट क्षेत्रातील नामवंत कुटुंबांसह हजेरी लावणार आहेत.
या वेळी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या 75 घटनांचा आढावा घेणारे “आधारवड‘ हे पुस्तक पाच भाषेत प्रकाशित होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारले आहे. नेहरू सेंटरमध्ये आज सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून, तत्पूर्वी शरद पवार हे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चाहते, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.