मुंबई हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीने गुरुवारी सत्र न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत, माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली.
अमेरिकेतील अज्ञातस्थळावरून हेडलीला व्हिडीओ लिंकद्वारे सुमारे साडेसहा वाजता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. २६/११ हल्ल्यासंबंधी हेडलीने अमेरिकेतील न्यायालयाला दिलेली सर्व माहिती सत्र न्यायालयाला देण्याचे आदेश न्यायाधीशांनी हेडलीला दिले.
त्यावर हेडलीने संपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन न्यायालयाला देत, सरकारी वकिलांचा साक्षीदार होण्याचीही तयारी दर्शवली. मात्र, आपल्या शिक्षेत माफी देण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली. न्यायालयानेही त्याला सशर्त माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी दिली.
२६/११ च्या हल्ल्याप्रकरणी हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयापुढे स्वत:च्या गुन्ह्यांची कबुली दिली होती.
गुरुवारच्या सुनावणीवेळी हेडलीने सत्र न्यायालयाने त्याच्यावर ठेवलेल्या आरोपांची माहिती असल्याचे न्यायाधीशांना सांगितले. ‘मला सर्व कागदपत्रे मिळाली आहेत. अमेरिकेच्या न्यायालयाने जे आरोप माझ्यावर ठेवले आहेत, तेच आरोप याही न्यायालयाने माझ्यावर ठेवले आहेत. मी अमेरिकच्या न्यायालयापुढे माझा या गुन्ह्यांत असलेला सहभाग मान्य केला आहे. त्यामुळे मी माझा गुन्हा या ही न्यायालयासमोर मान्य करतो. साक्षीदार म्हणून मी या न्यायालयासाठी उपलब्ध असेन. शिक्षेत माफी देण्यात आली, तर या हल्ल्यासंबंधी विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देण्यास तयार आहे,’ असे हेडलीने न्यायालयाला सांगितले. शिक्षेत माफी दिल्यास हेडली माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.