अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे अध्यक्ष एड गिलिगन यांचे शुक्रवारी रात्री विमान प्रवासात अकस्मात निधन झाले. गिलिगन कॉर्पोरेट विमानाने न्यूयॉर्कला चालले असताना अचानक वाटेत त्यांची तब्येत बिघडली आणि काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
५५ वर्षीय गिलिगन यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने विमानाचे लँण्डींग करण्यात आले. मात्र त्यांना वाचवता आले नाही. गिलिगन बिझनेस ट्रीपवरुन परतत होते.
गिलिगन यांचे आपल्यातून अचानक निघून जाणे अत्यंत दु:खद आणि कल्पनेपलीकडचे आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे असे अमेरिकन एक्सप्रेसचे सीईओ केन चेनॉल्ट यांनी कर्मचा-यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
क्रेडिट कार्डसाठी ओळखल्या जाणा-या अमेरिकन एक्सप्रेसमध्ये गिलिगन ३५ वर्षांपूर्वी इंर्टन म्हणून रुजू झाले होते. आपल्या मेहनतीच्या बळावर एकएक टप्पा पार करत २०१३ मध्ये कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. गिलिगन यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.