ट्रकची एसटीला धडक

ट्रकची एसटीला धडक

चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने सात प्रवासी जागीच ठार तर अन्य ३१ जण जखमी झाले. मृतांमध्ये पिता-पुत्रासह एका महिलेचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीपासून जवळ असलेल्या सुतारवाडी येथे बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अपघातामुळे तब्बल साडेचार तास वाहतूक ठप्प झाली.

चिपळूण एसटी आगारातून बुधवारी सकाळी ७.४५च्या सुमारास रत्नागिरीकडे निघालेली ‘सोनहिरा एक्स्प्रेस’ ही परिवर्तन बस सकाळी नऊच्या सुमारास बावनदी पुलाच्या पुढे सुतारवाडी वळणावर आली. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कोळसावाहू ट्रकने बसला धडक देत फरफटत नेले. बसमधील प्रवाशांना काही कळायच्या आधीच बस दरीच्या अगदी काठावर कलंडली. त्यातच हा ट्रक

बसवर उलटल्याने बसचा चक्काचूर झाला.

या अपघातात प्रभाकर शंकर क्षीरसागर (४०, सावर्डे, ता. चिपळूण, मूळ रा. सातारा), संतोष सीताराम करजावकर (४५, ठाणे), भास्कर सखाराम कोकाटे (६०, असुर्डे-सावर्डे, ता. चिपळूण), श्रीरंग ऊर्फ नारायण श्रीपाद कुलकर्णी (४५, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), राजाराम नारायण कुलकर्णी (१२, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), विजया शिवराम सुर्वे (४०, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), यशवंत धर्माजी मोहिते (६०, जाकादेवी, ता. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जखमींपैकी २७ जणांवर

जिल्हा रुग्णालयात, तर चारजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक साडेचार तास ठप्प झाली. अपघातस्थळाच्या दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दीड वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)

> बसचा पत्रा कापून प्रवाशांना काढले बाहेर

बस ट्रकच्या खाली दबल्याने काही प्रवाशांना बाहेर काढणे कठीण काम होते. अखेर रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने कटरने बसचा काही भाग कापत आतील प्रवाशांना बाहेर काढले. तब्बल तीन तास कटरद्वारे बसचा पत्रा, सीटस् कापण्याचे काम सुरू होते. ट्रकमधील दगडी कोळसा जेसीबीने बाजूला काढण्यात आला. दोन क्रेनच्या सहायाने पूर्णत: खिळखिळी झालेली बस व ट्रक खेचून रस्त्यावर आणली गेली.

> पोलादपूर : महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगारी गावाजवळ अंजुमन हायस्कूललगत एसटी व ओम्नी कारची समोरासमोर धडक बसली. यात ओम्नी कारमधील चालक राकेश मोरे (२२, रा. परसुले, ता. पोलादपूर) व सहप्रवासी रुपाली वाडकर (रा. जांभळी, ता. वाई) हे जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील महादेव दानवले, शैला दानवले, तुकाराम गोळे व रवी कदम हे किरकोळ जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी ७.४५ च्या दरम्यान घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *