मध्यप्रदेशमधील नरसिंहपूर रस्त्यावर शनिवारी सकाळी डॉक्टरांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नागपूरच्या पाच डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील जंगीवाही गावाजवळ हा अपघात झाला. डॉक्टरांच्या स्विफ्ट गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला समोरुन जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये अडकला होता. क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या स्विफ्ट कारला ट्रक बाहेर काढण्यात आले.
मृतांपैकी एका डॉक्टरची ओळख पटली असून, डॉ. साकेत गोलहार असे या डॉक्टरचे नाव आहे. साकेत प्रतिष्ठीत सर्जन डॉ. अनिल गोलहार यांचा मुलगा आहे.
साकेत निवासी डॉक्टर म्हणून काम करत होता. अपघाताची माहिती मिळताच मृतांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार छिंडवाडयाकडे रवान झाला आहे. हे सर्व डॉक्टर मध्यप्रदेशातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पंचमढी येथे चालले होते.