हाँगकाँगमधील कंपनी विकत घेण्याच्या नावाखाली एका भामट्याने नाशिकमधील अनेक गुंतवणूकदारांना 1 कोटी 5 लाख रुपयांना गंडा घातला आहे. सध्या एक कोटींचा आकडा समोर आला असला तरी प्रत्यक्षात ही रक्कम 30 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
प्रदीप वाघ असं या भामट्याचं नाव आहे. यासंदर्भात नाशिकच्या पाच गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
एचएसबीसीसह अनेक परदेशी बँकांमध्ये आपली 400 कोटींपेक्षाही जास्त रक्कम असल्याची खोटी कागदपत्रे दाखवून प्रदीपने गुंतवणुकदारांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याकडून पैसा गोळा केला होता. प्रदीप वाघने पुणे, ठाण्यासह इतर शहरातील लोकांनाही फसवल्याची चर्चा आहे.
दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी प्रदीप वाघच्या घरावर छापे मारले. पण यात त्यांना काहीही हाती लागलेलं नाही. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे.