उद्या मध्यरात्रीपासून बारा टोल नाके बंद

“टोलमुक्त महाराष्ट्र‘ अशी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने उद्या (ता. 31) मध्यरात्रीपासून बारा टोल नाके पूर्णपणे बंद करण्याचा, तर 53 टोल नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसना सूट देण्याच्या निर्णयावर आज शिक्‍कामोर्तब केले. यामुळे राज्यातील 12 टोल नाक्‍यांना एक जूनपासून कुलूप लागणार आहे. तर 53 पथकर स्थानकांवर कार, जीप व एसटी बसेसना टोलमुक्‍ती मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने आज जारी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 टोल नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील एक टोल नाका, असे एकूण 12 टोल नाके आहेत.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 27 टोल नाके व रस्ते विकास महामंडळाकडील 26 टोल नाके अशा एकूण 53 टोल नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसेसना सूट देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

या नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसेसना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे या वाहनांना पथकरात सूट असल्याची फलक लावण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्‍त महाराष्ट्राची घोषणा केली होती. या निर्णयाने सरकारने आश्‍वासनपूर्ती करत राज्यातल्या जनतेला दिलासा दिल्याचे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने घोषित केलेले टोल नाके एक जूनपासून बंद करावेत, अन्यथा दोन जूनपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस हे टोल बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दुपारीच दिला होता. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयाने बारा टोल पूर्णपणे बंद करण्याची, तर 53 टोल नाक्‍यावर सवलत देण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली.

बंद होणारे टोल नाके
1) वडखळ : अलिबाग-पेण-खोपोली
2) शिक्रापूर : वडगाव-चाकण-शिक्रापूर
3) मोहोळ : मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप
4) डोंगर : वडगाव-चाकण-शिक्रापूर
5) कुसळंब : टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-लातूर
6) अकोले (खु) : नगर-करमाळा-टेंभुर्णी
7) सप्तशृंगी : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
8) नांदुरी : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
9) ढकांबे : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
10) तापी पूल : भुसावळ-यावल, भुसावळ-अमोदा-न्हावी, अमोदा-फैजपूर
11) रावणटेकडी : खामगाव (बुलडाणा) बाह्य वळण रस्ता
12) तडाली : रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (चंद्रपूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *