इजिप्तची राजधानी कैरोमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात १८ जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट कैरो येथील सेंट्रल अगौजा भागातील एका नाइट क्लबमध्ये झाल्याची माहिती सुरक्षा अधिका-याने दिली. जखमींना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याच नाइट क्लबमध्ये काम करणा-या इसमांनी हा स्फोट घडवून आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यात ११ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी नाइट क्लबमध्ये स्फोट घडवून आणला, असे या क्लबचा व्यवस्थापक हुसैन हसन यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या या कर्मचा-यांना आत घेण्यास हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी मनाई केली. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास मोटर सायकलवरुन आलेल्या तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून क्लबवर पेट्रोल बॉम्ब फेकले व ते पसार झाले, असे हसन यांनी सांगितले.