त्या’ चाहत्याची माफी माग, सुप्रीम कोर्टाचे गोविंदाला आदेश

त्या’ चाहत्याची माफी माग, सुप्रीम कोर्टाचे गोविंदाला आदेश

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाने 2008 मध्ये एका चाहत्याच्या कानशीलात लगावलेला आवाज अजूनही घुमतोच आहे. एखाद्या फिल्मस्टारने सार्वजनिक ठिकाणी मारामारीसारखी कृत्य करु नयेत, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने गोविंदाला चाहत्याची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.
जस्टीस टी एस ठाकूर यांच्या खंडपीठाने गोविंदाने चाहत्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडिओ कोर्टात पाहिला. गोविंदाच्या वर्तणुकीवर आक्षेप घेत एखाद्या ‘पब्लिक फिगर’ने अशी कृत्य करणं चुकीचं असल्याचं मत कोर्टाने नोंदवलं.
‘एखादा अभिनेता रिल लाईफमध्ये जसं वागतो, तसं त्याने रिअल लाईफमध्ये वागण्याची गरज नसते’ असंही कोर्टाने म्हटलं आहे. गोविंदाच्या कृत्याबाबत खेद व्यक्त करत कोर्टाने त्याला हे प्रकरण कोर्टाबाहेर सोडवण्याबाबत विचारणा केली.

2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने संतोष रॉय यांना कानशीलात लगावली होती. अभिनेता होण्याच्या इच्छेने मुंबईत आलेल्या संतोष यांनी ‘त्या’ घटनेनंतर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कायदेशीर लढाई सुरुच ठेवण्याचा निर्धार रॉय यांनी व्यक्त केला होता.

केस लढताना वकिलांच्या फीवर लाखो रुपये खर्च झाले असले, तरी मी हार मानणार नाही अशी प्रतिक्रिया संतोष यांनी दिली होती. या प्रकरणात गोविंदाला न्यायालयाने नोटीसही बजावली होती. मुंबई हायकोर्टाने मात्र संतोषच्या केसवर सुनावणीला नकार दिला होता. घटनेला एक वर्ष उलटल्यानंतर अपील केल्याचं कोर्टाने सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *