पालघरमध्ये एका अकरा वर्षांच्या मुलाने आपल्या सात वर्षाच्या मित्राचा जीव वाचवला आहे. ऋषी तौरानी असं या शूर मुलाचं नाव आहे. त्यामुळे पालघरमध्ये या साहसी मुलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
25 नोव्हेंबरला 7 वर्षाचा चैतन्य मानकर आपल्या मित्रांसोबत सोसायटीमध्ये लपाछपीचा खेळ खेळत होता. यावेळी त्याने शेजारच्या साई निकेतन इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन आत उडी मारली. मात्र इमारतीतील चेंबर उघडा असल्याने तो थेट चेंबरमध्ये पडला. यावेळी चैतन्यच्या ओरड्याचा आवाज ऐकून ऋषी त्याच्या मदतीला धावला.
अंधारात ऋषीला चैतन्यचा फक्त हात दिसला. मात्र या हाताला धरुन त्याने चैतन्यला चेंबरबाहेर खेचलं. ऋषीने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचं पालघरमध्ये सध्या चांगलंच कौतुक होतं आहे. दरम्यान, या घटनेमुळे नगरपरिषदेने सोसायटीच्या प्रत्येक चेंबरची तपासणी करण्याची मागणी करण्यात येते आहे.