हॉलिडे पार्टी सुरु असताना अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात 14 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन हल्लेखोर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. स्थानिक दहशतवाद्यांनी हल्ला घडविल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने येथील आरोग्य केंद्रामध्ये “हॉलिडे पार्टी‘ आयोजित केली होती. दरम्यान स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता बंदूकधारी हल्लेखोरांनी समारंभस्थळी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत या हल्ल्यात 14 जण ठार झाले होते. तर 17 जण जखमी आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे. तीन जणांनी मिळून हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन जण ठार झाले आहेत. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ठार झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचा या हल्ल्यात समावेश होता का याचा पोलिस शोध घेत आहेत. तर एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात एक हल्लेखोर जिवंत पकडल्याचे म्हटले आहे.