मागील अनेक वर्षापासून चर्चेत असलेले ‘सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रित लोकल’ शुक्रवारी सायंकाळी चर्चगेट ते वांद्रे स्थानकांदरम्यान धावली. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी या लोकलला हिरवा झेंडा दाखवला.
‘सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रित लोकल’साठी मागील अनेक दिवसांपासून पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत चाचण्या सुरू होत्या. २७ मे ते ९ जून दरम्यान रेल्वे प्रवासी पंधरवडय़ाचे निमित्त साधून ही सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर केवळ ठरावीक लोकलमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर उपयुक्ततेनुसार सर्वच लोकलमध्ये महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
मागील काही दिवसांत धावत्या लोकलमध्ये महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने हे सीसीटीव्ही महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. सुरुवातीला तीन लोकलमध्ये ४ ते ८ सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. नव्याने बसवण्यात आलेले लोकलमधील सीसीटीव्ही महिलांच्या डब्यातील प्रत्येक कानाकोप-यांवर नजर ठेऊन असणार आहेत. या कॅमे-यात ३० दिवस रेकॉर्डिगची क्षमता आणि हे कॅमेरे थ्रीजी सेवा असणार आहेत.