सर्व लोकल १५ डब्यांच्या करणे अशक्य

सर्व लोकल १५ डब्यांच्या करणे अशक्य

मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन १५ डब्यांच्या लोकल चालवण्याची मागणी होत आहे. मात्र, अपु-या स्टेबलिंग लाईन (पार्किंग)आणि फलाटांच्या लांबीमुळे मध्य रेल्वेवर सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या चालवणे कठीण असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळातही जीवघेणा प्रवास हा सुरूच राहणार आहे.

सध्या, मध्य रेल्वेवर १५ डब्यांची एकच लोकल चालवण्यात येते. कल्याण ते सीएसटी दरम्यान ही गाडी चालवली जाते. मात्र या गाडीला रात्रीच्या वेळी फे-या संपल्यानंतर स्टेबलिंग लाईनला (पार्किंगला) उभे करण्यासाठी जागा नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सध्या सुरूअसलेल्या लोकलला स्टेबलिंग लाईनमध्ये उभे करण्यासाठी कसरती कराव्या लागत आहे. ही लोकल जलद मार्गावरच उभी करावी लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सध्या, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर

८२५ लोकल चालवल्या जातात. यामध्ये २४१ जलद आणि ५८१ धीम्या लोकल चालवण्यात येतात. तर हार्बर मार्गावर ५८० आणि ट्रान्सहार्बर मार्गावर २१० लोकल चालवल्या जातात. यातील १५ डब्यांची एक  लोकल वगळता सर्व लोकल १२ आणि ९ डब्यांच्या आहेत.

त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेला नव्याने स्टेबलिंग लाईन तयार कराव्या लागतील. तसेच, धीम्या मार्गावरील अनेक फलाट हे केवळ १२ डब्यांच्या लोकलसाठी उपयुक्त आहेत. परिणामी, सध्या सुरूअसणारी लोकल ही केवळ जलद मार्गावर चालवली जात आहे.

याशिवाय, मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ३५ गाडय़ांचे आयुर्मान संपल्याने पश्चिम रेल्वेवरून येणा-या लोकलनंतर या जुन्या लोकल सेवेतून हद्दपार करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पंधरा डब्यांपूर्वी हार्बरचे १२ डब्बे

दरम्यान, येत्या काही काळात हार्बर मार्गावरील फलाटांच्या लांबीचे काम पूर्ण केले जाणार आहे. या मार्गावर १२ डब्यांच्या लोकल चालवणे शक्य होणार आहे. शिवाय, हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तन देखील लवकरच केले जाणार असल्याने पंधरा डब्यांच्या लोकलपूर्वी हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकल चालवली जाणार आहे.

यापूर्वी सहा आणि नऊ डब्यांच्या लोकल चालवण्यात येत होत्या. त्यानंतर त्या १२ डब्यांच्या केल्या. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार एक गाडी चालवली जाते. मात्र, या गाडीला उभे करण्यासाठी स्टेबलिंग लाईन (पार्किंग) उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येत्या काही काळात १५ डब्यांच्या गाडय़ा चालवणे शक्य नाही.
– नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *