मला न्याय हवा आहे. ४६ वर्षापूर्वी त्यांच्याशी मी विवाह केला होता. त्यांच्यासोबत मी दोन वर्षे काढली आहेत. आता मात्र मला माझ्या जीवाची भीती वाटते. माझ्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांकडूनच माझी हत्या होईल, असे वक्तव्य जसोदाबेन नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पंतप्रधानांच्या पत्नींना असलेले अधिकार, सुरक्षा व्यवस्था, राजशिष्टाचार, सुविधा आदींची माहिती जसोदाबेन मोदी यांनी मेहसाणाचे पोलीस अधीक्षक जे. आर. मोथालिया यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत मागवली. त्यांनी गुजरातीत लिहिलेले तीन पानांचे पत्र मोथालिया यांच्याकडे दिले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी हत्या केली होती. त्यामुळे मला सुरक्षा रक्षकांची भीती वाटते. माझ्या नियुक्तीसाठी तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तैनातीची प्रत मला दिलेली नाही. माझ्या सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या आदेशाची प्रमाणीत प्रत मला दिली जावी, अशी मागणी जसोदाबेन यांनी केली.
या भेटीनंतर जसोदाबेन यांचा भाऊ कमलेश मोदी म्हणाले की, माझी बहीण जसोदाबेनने पंतप्रधान मोदींशी कायदेशीर विवाह केला आहे. ती सर्वत्र बस व रिक्षाने प्रवास करते. मात्र, त्यांचे सुरक्षा रक्षक वातानुकूलित वाहनातून प्रवास करतात. माझी बहीण असुरक्षित आहे. तिला अधिक सुरक्षा व्यवस्था व पंतप्रधानांच्या पत्नीला मिळणा-या सर्व सुविधा दिल्या जाव्यात. तिने संपूर्ण आयुष्य दु:ख भोगले आहे, असे त्यांनी सांगितले.