तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आयोजित ‘तळवलकर्स क्लासिक २०१५’ आमंत्रित शरीरसौष्ठव स्पर्धा १६ आणि १७ डिसेंबरमध्ये मुंबईत होईल. या स्पर्धेद्वारे देशभरातील ३० अव्वल शरीरसौष्ठवपटू आपले नशीब अजमावतील. मिश्र (पुरुष आणि महिला) जोडीचा सहभाग हे यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्टय़ आणखी एक वैशिष्टय़ आहे. इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने होणा-या या स्पर्धेत एकूण १६ लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्राचे सरचिटणीस विक्रम रोठे आणि राजेश सावंत यांच्यासह प्रमुख शरीरसौष्ठवपटूंच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत ‘तळवलकर्स क्लासिक २०१५’ची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेद्वारे गतविजेता मुरली कुमारसह (भारतीय नौदल) ‘मिस्टर एशिया’ सुनीत जाधव, जगदीश लाड, बी. महेश्वरन (तिघेही महाराष्ट्र), विपीन पीटर (भारतीय नौदल), ए. बॉबी सिंग (रेल्वे) तसेच आशियाई स्पर्धेतील पदकविजेती महिला शरीरसौष्ठवपटू श्वेता राठोड आदी शरीरसौष्ठवपटूंना एकत्रित पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
‘तळवलकर्स क्लासिक’ स्पर्धा यापूर्वी २०१३मध्ये झाली होती. त्यावेळी भारतीय नौदलाच्या मुरली कुमारने बाजी मारली होती. स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना मधुकर तळवलकर म्हणाले की, ‘‘ही स्पर्धा दरवर्षी व्हावी, असे आयबीबीएफच्या पदाधिका-यांना वाटते. मात्र दरवर्षी स्पर्धा झाल्यास तेच तेच शरीरसौष्ठवपटू विजेते होण्याची शक्यता वाढते. दोन वर्षे फॉर्म आणि फिटनेस ठेवणे, सोपे नाही. त्यामुळे ही स्पर्धा दोन वर्षानी घेण्याचे आम्ही ठरवले आहे. केवळ स्पर्धा म्हणून आम्ही ‘तळवलकर्स क्लासिक’कडे पहात नाही. प्रतिभावंत शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देणे, हा त्यामागील आमचा मूळ उद्देश आहे. एका शरीरसौष्ठवपटूमुळे शेकडो लोकांना प्रोत्साहन मिळते.’’ ‘तळवलकर्स क्लासिक २०१५’मध्ये ३० शरीरसौष्ठवपटूंना संधी दिली जाणार आहे. त्यातील २६ जणांचा सहभाग निश्चित आहे. ‘मिस्टर इंडिया’ तसेच अन्य राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांसह प्रतिभावंत शरीरसौष्ठवपटूंना प्राधान्य देण्यात आल्याचे आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेची अंतिम निवडचाचणी (प्री-जजिंग) १६ डिसेंबरला ऑर्किड हॉटेल (विलेपार्ले) येथे होईल. सहभागी ३० स्पर्धकांमधून १० जणांची अंतिम स्पर्धेसाठी निवड होईल. अंतिम फेरी १७ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण सभागृहात (चर्चगेट) होईल.
विजेत्याला मिळणार ५ लाख
एकूण १६ लाखाची बक्षीसे असलेल्या या स्पर्धेतील विजेत्याला पाच लाख आणि झळाळती ट्रॉफी मिळेल. उपविजेत्याला तीन तसेच तिस-या क्रमांकावरील स्पर्धकाला दोन लाख मिळतील. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येकाला रोख रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दहाव्या क्रमांकावरील स्पर्धकाला ३५ हजार रुपये मिळतील. मिश्र जोडी प्रकारातील विजेती जोडी लखपती होईल.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा संघ
तळवलकर्स क्लासिकमध्ये यजमान महाराष्ट्राचा संघ सर्वात मोठा आहे. त्यात ९ जणांचा समावेश आहे. ‘मिस्टर एशिया’ सुनीत जाधव, जगदीश लाड, बी. महेश्वरन, सागर कातुर्डे, संग्राम चौगुले, स्वप्नील नरवडकर, सागर माळी, महेंद्र चौहान, दीपक त्रिपाठीकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.