नवाझ शरीफांनी पुन्हा आळवला काश्मीरी राग

नवाझ शरीफांनी पुन्हा आळवला काश्मीरी राग

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी फुटीरवादी पार्टी दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख असिया अंद्राबी हिला पत्र लिहीले असून यात शरीफांनी पुन्हा काश्मीरी राग आळवला आहे.

जम्मू- काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सार्वमत हाच एकमेव उपाय आहे. काश्मीरप्रश्नी पाकिस्तानची जबाबदारी काय आहे हे आपणास माहित आहे. त्यामुळे यापुढेही आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे शरीफ यांनी या पत्रात म्‍हटले आहे.

या पत्रात शरीफ यांनी काश्‍मीर प्रश्नावर आसियाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले असून तिच्या भावना आणि विचारांबाबत धन्यवाद व्यक्त केले आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अल्लाह मला शक्ती देवो, अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात ‘रेडिओ पाकिस्तान‘ने रविवारी वृत्त प्रसारित केले होते. या वृत्तानुसार, शरीफ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, काश्‍मीर म्हणजे सीमाप्रश्‍न आहे असे आम्ही मानत नाही. भारतीय उपखंडाच्या १९४७ मध्ये झालेल्या फाळणीचा अपूर्ण राहिलेला एक भाग, असे आम्ही काश्‍मीरकडे पाहतो. पाकिस्तान काश्‍मीरच्‍या लोकांना निर्णय घेण्‍याचा पूर्ण अधिकार देत आहे आणि पाकिस्तान कायम काश्मीरी जनतेच्‍या सोबत आहे, असे त्यांनी या पत्रात म्‍हटले आहे. तसेच न्यायहक्कासाठी लढणा-या काश्‍मीरी जनतेला पाकिस्तानचा कायम नैतिक, राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा असेल, अशी ग्वाहीही शरीफ यांनी दिली आहे.

शरीफ यांनी या पत्रात भारत दुतोंडी बोलत असल्‍याचा आरोप केला आहे. भारताने वर्ल्ड कम्युनिटीला वचन दिले होते की, काश्‍मीरी लोकांना त्‍यांचे राजकीय भविष्‍य ठरवण्‍याचा पूर्ण अधिकार राहील. हे सर्व जगाला माहित आहे. कारण अनेकवेळा या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रादरम्यान चर्चा झालेली आहे. परंतू या वचनावरून भारताने आता माघार घेतली असल्याचा उल्लेख या पत्रात त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *