राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण सोडावे. राजनाथसिंह यांना पक्षाचे अध्यक्ष, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी अमित शहा यांची निवड करावी अशी धक्कादायक मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी आज केली.
‘पीटीआय‘शी बोलताना ते म्हणाले, की बिहारमधील पराजयाने खचून न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्ष बांधणीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. बिहारमधील पराजयाची जबाबदारी मोदी- शहा टीम नाकारू शकत नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार यांनी मोदी- शहा यांच्याविरोधात पत्र काढून नाराजी व्यक्त केली होती, त्याचे समर्थनही गौतम यांनी केले आहे. ते म्हणाले की, अमित शहा यांच्या अनुभवाचा फायदा गुजरातला होऊ शकतो. तेथील पटेलांचे आंदोलन हाताळण्यात आनंदीबेन पटेल यांना अपयश आले आहे, त्यामुळे त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री करावे. मोहन भागवत यांनी राजकारण न करता संघ अधिक बळकट कसा होईल याकडे लक्ष द्यावे.
लोकसभेची पुढील निवडणूकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाने लढविली पाहिजे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, “”केंद्रात गडकरी यांनी उत्तम काम केले आहे, त्यामुळे त्यांना उपपंतप्रधान केले पाहिजे. बिहार निवडणुकीदरम्यान भाजप आणि संघाच्या काही नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने त्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली. यापुढे वादग्रस्त विधाने करणे थांबविल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील पक्षाची स्थितीही म्हणावी तशी चांगली नाही, त्यामुळे केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांना राज्याच्या उत्तरभागाची जबाबदारी द्यावी. ते जातीचे समीकरण हाताळण्यात तरबेज आहेत. त्याचा पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
