महापौरांनी केले अनधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरचे उद्घाटन

महापौरांनी केले अनधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरचे उद्घाटन

कधी स्वत: तर कधी पक्षाला अडचणीत आणणा-या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. मागील दिवाळीमध्ये महापौर बंगल्यावरील कार्यक्रमात नृत्य केल्यामुळे वादात अडकलेल्या स्नेहल आंबेकर यंदाही डॉकयार्ड रोड येथील अनधिकृत उपाहारगृह व हुक्कापार्लरचे उद्घाटन केल्यामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.

महापौरांनी या अनधिकृत हॉटेलचे उद्घाटन करत एक प्रकारे अनधिकृत बांधकामांचे समर्थन केल्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या सभागृहात उमटले.

मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी हुक्कापार्लर विरोधात मोहीम घेऊन ते बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु शुभा राऊळ हे हुक्कापार्लर बंद करण्यासाठी झटत असताना विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांनी चक्क हुक्कपार्लरचे उद्घाटन केले असल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित केली. डॉकयार्ड रोड पोस्ट ऑफिसजवळ ‘उस्तादी’ नावाचे उपाहारगृह व हुक्कापार्लर असून याचे उद्घाटन ६ नोव्हेंबर रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पार पडले.

हे उपाहारगृह व हुक्कापार्लर अनधिकृत असून मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. झेनब नावाच्या संकेतस्थळावर या उपाहारगृहात हुक्कापार्लरची सेवा दिली जात असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

त्यामुळे अनधिकृत उपाहारगृह आणि त्यातच हुक्कापार्लर असल्यामुळे याचे उद्घाटन महापौरांनी करून या अनधिकृत हुक्कापार्लरला आपला पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. महापौरांनी उद्घाटन केल्यामुळे यावर बी विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

देशपांडे यांच्या हरकतीच्या मुद्दयाला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा देत, हे उपाहारगृह व हुक्कापार्लर अनधिकृत असल्याचे सांगितले. हे आपल्या घराशेजारीच असून त्यात आजही अनधिकृत बांधकामे केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे असलेल्या हुक्कापार्लरचे उद्घाटन महापौरांनी करावे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही याचा निषेध केला. महापौरपद हे जबाबदारीचे आहे. यापूर्वी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी असाच घोळ घालत वादाला फोडणी दिली होती. आता पुन्हा त्यांनी अनधिकृत उपाहारगृहाचे उद्घाटन करताना बेजबाबदारपणा दाखवून दिला आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात शिवसेना पक्ष आहे.

शिवसेना कधीही अनधिकृत बांधकामांचे समर्थन करू शकत नाही. त्यामुळे महापौरांनी उद्घाटन केले आहे ते अनधिकृत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल, असे सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर हा हरकतीचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्षांनी राखून ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *