शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे दोन कोटींचे उत्पन्न

दुष्काळी परिस्थितीवर मात करीत सेनगाव तालुक्‍यातील पार्डी पोहकर येथील अभिनव शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकजुटीतून झेंडूचे उत्पादन घेत तब्बल दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सेनगाव तालुक्‍यातील पार्डी पोहकर हे गाव झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात कमी पाऊस असताना देखील शेतकरी आहे त्या पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून पिके घेतात. गावात सुमारे शंभर ते दीडशे सातबारा आहेत. हे सर्व शेतकरी दरवर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतात. या वर्षीही पाऊस कमी असतानाही जुलै महिन्यात ठिबक सिंचन, तुषार पद्धतीने पाणी देऊन झेंडूची रोपे लावण्यात आली होती. या रोपांना वारंवार पाणी, विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकद्वारेच देण्यात आल्या. याशिवाय रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारण्यादेखील केल्या.
साधारणतः दसऱ्याच्या आसपास झेंडूचा पहिला तोडा हाती आला. त्यानंतर आता दिवाळीच्या सुमारास दुसरा तोडा हाती आला आहे. झेंडूची फुले हैदराबाद, बंगळूर येथील व्यापाऱ्यांनी गावात येऊन खरेदी केली. दिवाळीपूर्वीच झेंडूच्या फुलांचा 33 ते 36 रुपये किलो दर ठरविण्यात आला होता.

व्यापाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांना केवळ तोडणीचा खर्च लागला आहे. एका शेतकऱ्यास एका एकरमध्ये सुमारे चाळीस क्विंटल फुलांचे उत्पादन मिळाले आहे. सुमारे दीडशे एकरावर घेण्यात आलेल्या झेंडूच्या उत्पादनातून गावाने तब्बल दोन कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. विशेष म्हणजे या वेळी कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी पाणी देऊन एकमेकांना मदतही केली आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीच्या जोरावर दुष्काळावरही मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *