वाशिम येथे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्याने २३ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली होती. याआधी चार जणांना दृष्टी परत मिळाली होती. परंतु, आता आणखीन तीन जणांना दिसू लागले आहे. त्यामुळे, एकूण सात जणांना त्यांची गमावलेली दृष्टी मिळवून देण्यात जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले असून अन्य १६ जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते पाहू शकतील की नाही हे येत्या महिन्याभरात कळेल, अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉक्टरांमार्फत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये १७१हून अधिक लोकांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी वापरलेली साधने ही र्निजतूक करणे आवश्यक असतानाही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या २३ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे.
डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रागिनी पारेख व डॉ. प्रीतम सावंत यांनी या रुग्णांवर शस्त्रक्रिया करत त्यांना पुन्हा दृष्टी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना यश येत असून, सात जणांना दृष्टी मिळवून देण्यास डॉ. लहाने यांच्या टीमला यश आले आहे.