पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर-विक्रोळी मेट्रो ६ प्रकल्पाच्या कांजुरमार्ग कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. कांजुरमार्ग येथील मिठागराच्या जमिनीतील मेट्रो ६साठी राखीव असलेल्या १५ हेक्टर जागेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा १३ फेब्रुवारीचा आदेश कायम राहिला आहे.
या निर्णयामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या मेट्रो ६ प्रकल्पाला कांजुरमार्ग येथे कारशेड मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. विकासक महेशकुमार जी. गरोडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी, तर प्रतिवादींच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
१६ एप्रिलच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला कायद्यानुसार उपलब्ध उपाययोजनांचा अवलंब करण्याची मुभा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि याचिका फेटाळली. त्यामुळे या प्रकरणातील प्रलंबित अर्जही निकाली काढण्यात आले.
कांजुरमार्गच्या मिठागर जमिनीशी संबंधित विविध सरकारी आदेशांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यात मेट्रो ६च्या डेपोसाठी १५ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. १३ फेब्रुवारीच्या निर्णयात उच्च न्यायालयाने या याचिकांवर निकाल दिला होता.
१५ ऑक्टोबर १९१७ रोजी कांजुरमार्ग येथील जमीन मिठाच्या उत्पादनासाठी ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. यातील आर्थर सॉल्ट वर्क्सचा भूखंड सुमारे २५१ एकरांचा होता. जेनकिन्स सॉल्ट वर्क्सचाही या मोठ्या भाडेपट्ट्याच्या जमिनीत समावेश होता. सॉल्ट विभागाने २००४मध्ये हा भाडेपट्टा रद्द केला. त्याविरोधातील दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित असतानाच ऑक्टोबर २०१६मध्ये ९९ वर्षांची भाडेपट्टा मुदत संपली.
१७ मार्च २०२६ रोजीच्या स्वतंत्र निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाने ९९ वर्षांची मुदत संपल्यानंतर संबंधित दिवाणी दावा निष्फळ ठरल्याचे स्पष्ट केले होते. भाडेपट्टा अद्याप वैध आणि अस्तित्वात असल्याची घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र, भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ही मागणी कायम राहू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते. १६ एप्रिलच्या संबंधित कार्यवाहीत सर्वोच्च न्यायालयानेही दिवाणी दावा प्रलंबित असतानाच भाडेपट्ट्याची ९९ वर्षांची मुदत संपल्याची नोंद केली होती. त्यामुळे भाडेपट्टा कालावधी समाप्त झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मेट्रो ६चे ८८ टक्के काम पूर्ण
स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी – विक्रोळी मेट्रो ६चे काम ऑगस्टअखेर ८८ टक्के पूर्ण झाले आहे. ही मार्गिका २०२७मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील १५ हेक्टर जागा मेट्रो ६च्या डेपोसाठी महत्त्वाची मानली जाते. या जागेबाबतचा उच्च न्यायालयाचा
आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने डेपोच्या जमिनीशी संबंधित या टप्प्यावरील न्यायालयीन अडसर दूर झाला आहे.
