जामखेडमधील खर्डा परिसरात काल शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या थरारक हत्येनं खळबळ उडाली आहे. जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अनोळखी इसमांनी दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांपैकी एकाने कोयत्याने मानेवर सपासप वार केल्याने तानाजी भास्कर बोराडे (वय 40, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.
पिकअप वाहनावर चालक म्हणून काम
हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. गंभीर जखमी बोराडे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तानाजी बोराडे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअप वाहनावर चालक म्हणून काम करत होते. एमएच 12 केपी 5626 क्रमांकाच्या वाहनातून ते दररोज परिसरातील दूध संकलित करून खर्डा येथे आणत होते. शुक्रवारीही नेहमीप्रमाणे दूध वाहतूक केल्यानंतर ते आपल्या कामासाठी निघाले होते. याचदरम्यान काही व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतलं.
एकापाठोपाठ सपासप वार
फाट्याजवळ पोहोचताच बोराडे यांचा संशयितांशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर मारामारी सुरू झाली. काही कळण्याच्या आतच एका हल्लेखोराने हातातील कोयत्याने बोराडे यांच्या मानेवर जोरदार वार केले. एकापाठोपाठ झालेल्या वारांमुळे बोराडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून धूम ठोकली. मुख्य रस्त्यालगत भरदिवसा घडलेल्या या हत्येनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी बोराडे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.
