धाराशिवमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, तिला कुस्ती क्षेत्रात ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. मात्र मुलांना घेऊन आत्महत्येचं टोकाचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता सदर घटनेची पोलीस चौकशी करत आहेत.
