चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या बहाण्याने एका भोंदू महाराजाने 27 वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. याप्रकरणी भीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव शुभम खंगार असं असून त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी बाहेर पाठवून…
पीडित महिलेच्या पतीची प्रकृती वारंवार बिघडत होती. उपाय म्हणून भोंदू महाराजाने एक पूजा ठरली. मात्र आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी बाहेर पाठवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडीतेने भीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तक्रार केली. पोलिसांनी शुभम खंगार याच्यासह साथीदार सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांना अटक केली असून भिसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अंधश्रद्धेचा गैरफायदा
अशा घटनांमध्ये आस्था आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो. कालसर्प दोष किंवा ग्रहदोष निवारणासाठी पूजा-पाठ, तंत्र-मंत्र किंवा खाजगी विधी करण्याच्या नावाखाली महिलांना एकटे बोलावून त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वेळोवेळी समोर आले आहेत. पीडितेच्या खासगी माहितीचा वापर करून विश्वास जिंकला जातो आणि नंतर शोषण केले जाते.
खरात प्रकरणानंतर तक्रारी वाढल्या
महाराष्ट्रात भोंदू बाबा किंवा स्वयंघोषित महाराजांकडून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वारंवार समोर आल्या आहेत. आस्था, ग्रहदोष, कालसर्प दोष, बाधा, संतानप्राप्ती किंवा कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली विश्वास जिंकून यौन शोषण, बलात्कार, ब्लॅकमेल आणि आर्थिक फसवणूक केली जाते. याच वर्षी नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर अशा तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि दोन महिन्यांत ३५ हून अधिक भोंदूबाबांवर गुन्हे दाखल झाले.
सर्व बाबांची मोडस ऑपरेंडी सारखीच
हे बाबा सहसा कुटुंबातील समस्या, आरोग्य किंवा आर्थिक अडचणींचा फायदा घेतात. एकटी महिला बोलावणे, गुंगीचे पाणी किंवा प्रसाद देणे, खाजगी विधी करणे आणि नंतर धमकी देण्याची रणनीती वापरली जाते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा 2013 आणि भारतीय न्याय संहितेच्या बलात्कारविषयक कलमांखाली कारवाई होते. अशा घटना थांबवण्यासाठी अंनिससारख्या संघटना जागरूकता करतात. पीडितांनी भीती न बाळगता पोलिसात तक्रार करावी, असं आवाहन सामाजिक संघटनांकडून केलं जातं. खाजगी विधी, एकटे जाणे किंवा मोठ्या रकमेची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणं अधिक हिताचं ठरतं. अशा संशयास्पद गोष्टींची पोलिसांकडे ताबडतोब तक्रार नोंदवा, असंही समाजसेवक सांगतात.
