नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे (मायग्रेशन सर्टिफिकेट) तयार करून त्यांची लाखो रुपयांत विक्री केल्याच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर आणि त्याच्या एका साथीदाराला आज शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी नागपूर येथील एका घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. गौरकरच्या अटकेमुळे या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील बनावट पदवी व गुणपत्रिकांची पाच ते दहा लाख रुपये किमतीत विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. विशेषतः शासकीय नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरीतील पदोन्नतीसाठी या बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर तपासाला वेग
चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी या प्रकरणाची तक्रार दुर्गापूर पोलिसांकडे केली होती. तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर आणि पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. या प्रकरणात यापूर्वी वैभव सोनुले या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमल गौरकर आणि त्याच्या साथीदाराला अटक झाल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.
