32 कोटी लाटण्याचा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन आखला, वसईत थरारक घटना

वसईतील उद्योजक मोहनसिंग परमार (४६) यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार सागर भानुशाली (३३) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. परमार यांच्याकडून घेतलेले ३२ कोटी रुपये परत करणे टाळण्यासाठी आणि ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.

मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’चा अध्यक्ष आहे, तर परमार हे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे सागर भानुशालीला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. शुक्रवारी एनएसईवर ‘जीएसएम फॉइल्स’च्या शेअरची किंमत २० टक्क्यांच्या ‘लोअर सर्किट’सह १९२ रुपयांवर बंद झाली. “कंपनीच्या कामकाजात सातत्य राखण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापन टीमने आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या, वसई आणि अहमदाबाद येथील कंपनीचे उत्पादन प्रकल्प सुरळीतपणे सुरु आहेत,” अशी माहिती कंपनीने एनएसई वर दिली.

32 कोटी परत करणे टाळण्यासाठी कट

जीएसएम फॉईल्स ही कंपनी औषधनिर्माण क्षेत्रासाठी ‘ब्लिस्टर फॉईल्स’ आणि ‘ॲल्युमिनियम फार्मा फॉईल्स’च्या उत्पादनाचे काम करते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, सागर भानुशालीने परमार यांना कंपनीतील आपला हिस्सा विकत घेण्यास राजी केले होते. त्याबदल्यात जवळपास ३२ कोटी रुपये मिळवले होते. मात्र, ही रक्कम परत करण्याऐवजी त्याने परमार यांचा काटा काढण्याचा कट रचला. परमार यांच्या मृत्यूनंतर आपली आर्थिक जबाबदारी संपेल आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल, असा त्याचा समज होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *