‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (पीआयटीसीएमआरएल) ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकाजवळ ६० मीटर लांबीचा पादचारी पूल उभारण्याचे काम सोमवारी पहाटे पूर्ण केले. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या वाकड चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा पर्याय मिळाला आहे. या पुलाचा वापर मेट्रो प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही करता येणार आहे.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे, वाकड चौकातून पायी रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत होते. नव्या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले असून, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अखंड मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. वाकड चौक हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असल्याने, पुलाची उभारणी अभियंत्यांसाठी मोठे तांत्रिक आव्हान होते. वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होण्याच्या दृष्टीने संपूर्ण काम रात्री करण्यात आले. शनिवारी रात्रीपासून पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. नागरी अभियांत्रिकी पथकाने सलग दोन रात्री अखंड काम करून सोमवारी सकाळपर्यंत पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी यशस्वीपणे जोडली.
