बीडीडी रहिवाशांना ५५० चौरस फुटांच्या सदनिका?

बीडीडी रहिवाशांना ५५० चौरस फुटांच्या सदनिका?

दिवाळीत कामाला सुरुवात होणार
गेली अनेक वर्षे केवळ चर्चेत असलेली बीडीडी चाळी पुनर्विकास योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. वरळी, नायगाव, डिलाइल रोड व शिवडी येथे सुमारे शंभर एकरावर उभ्या असलेल्या चाळींच्या पुनर्विकास योजनेत तेथील रहिवाशांना ५०० ते ५५० चौरस फुटांच्या सदनिका मोफत व मालकी हक्काने देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन पिढय़ांपासून अक्षरश: कोंडवाडय़ाचे जिणे जगणाऱ्या १६ हजार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
धारावीत २७० फुटांची घरे
दुसऱ्या बाजूला, राजकीय वादात अडकलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पालाही गती देण्याचे काम सुरू आहे. परंतु धारावी पुनर्विकासात तेथील झोपडपट्टीवासीयांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार (एसआरए) २७० चौरस फुटांची घरे देण्याचे घाटत आहे. धारावी झोपडपट्टीवासीयांना किमान ४०० चौरस फुटांची घरे मिळालीच पाहिजेत, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेने रान उठविले होते. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची धारावी प्रकल्पातील या प्रस्तावित बदलाबाबत आता नेमकी काय भूमिका राहणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या बीडीडी चाळी आहेत. अतिशय तुटपुंज्या जागेत खुराडय़ात राहावे, तशी त्यात १६ हजार कुटुंबे या घरांमध्ये राहतात. ती बहुतांश मराठी कुटुंबेच आहेत. या चाळींचा पुनर्विकास करण्याची चर्चा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. सरकारी पातळीवर त्यासाठी अनेक समित्या झाल्या, अहवाल आले, परंतु चाळी मात्र आहेत तशाच राहिल्या. आता युती सरकारने त्याबाबत वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची योजना तयार झाली आहे, अशी सूत्राकडून माहिती मिळाली. दिवाळीच्या सणाच्या दरम्यान पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *